शिक्षक बनले स्वयंपाकी!

Ahmednagarlive24
Published:

वर्धा, दि. 17 : कोरोनामुळे अनेक स्थलांतरीत मजुरांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.

सध्याच्या या संकटसमयी शिक्षकांनी असेच माणुसकीचे दर्शन घडवत स्वतः स्वयंपाक तयार करून या निराश्रितांना मायेचे दोन घास भरवण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात स्थलांतरीत मजुरांचा आकडा आठ हजाराच्या पुढे गेला आहे.

त्यांची सोय प्रशासन, स्वयंसेवी संघटना आणि कंपन्यांच्या सहकार्याने विविध निवारागृहात करण्यात आली आहे. त्यात पुन्हा चाळीस मजुरांची भर पडली आहे. बालाघाट, छत्तीसगढ व विदर्भातील हे मजूर अहमदनगरहून निघाले होते. त्यांना प्रशासनाने वर्धेत अडवून इथेच थांबण्याची विनंती केली. मात्र, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचा प्रश्न उद्भवल्यावर राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवाराने ही जबाबदारी घेत प्रशासनाला सहकार्य केले.

प्रशासनाने नवजीवन छात्रालय उपलब्ध करून दिल्यावर या मजुरांसाठी स्वतः प्राथमिक शिक्षकांनी वर्गणी गोळा करून यांची जेवणाची व इतर व्यवस्था केली आहे. मुख्य म्हणजे ते स्वतः स्वयंपाक करून त्यांना गरम जेवू घालतात. सकाळी चहा, पोहे, दुपारी जेवणात वरणभात, भाजी, चपाती तसेच रात्रीचे जेवण स्वतः बनवतात. त्यांना देण्यात येणारे जेवण उत्तम आहे याची शंका राहू नये म्हणून स्वतःही त्यांच्यासोबत जेवण करतात. या सर्व आश्रितांना कपडे व आंघोळीचा साबण, केश तेल व दंतमंजनही देण्यात आले आहे.

पालकमंत्री सुनील केदार यांनी सुद्धा शिक्षकांच्या या सेवेचे कौतुक केले आहे. याबाबत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय कोंबे म्हणाले की, शिक्षकांनी सुरुवातीला धान्य व किराणा अशी एकत्रित 150 किट वाटल्या आहेत. पण या मजुरांचा प्रश्न समजल्यावर आम्ही लागलीच या कामाला होकार दिला.

या निमित्ताने भुकेल्यांची सेवा करण्याची संधी शिक्षकांना मिळाली आहे. सुरुवातीला 21 हजार रुपये आमच्याकडे जमा झाले होते. त्यानंतर केवळ आठ दिवसात खात्यात 4 लाख रुपये जमा झाले आहेत. या निधीच्या भरोशावर सेवेच व्रत आम्ही पुढील किमान महिनाभर चालवू शकतो. तसेच जिल्हा परिषदेला सुद्धा मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या या सेवेमुळे शिक्षकांवरचे अनेक आरोप बंद होतील, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली. याठिकाणी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेची दक्षता घेण्यात आली असून आळीपाळीने सर्व शिक्षक ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी स्वत:सोबतच कुणाचेही नाव न छापण्याची विनंती केल्यामुळे शिक्षकांची नावे यामध्ये घेतली नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment