यवतमाळ 18 मे 2020 :- कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे रोजंदारीवर जगणा-या स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे.
असाच गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या बसचा यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 प्रवासी जागीच ठार झाले असून 22 व्यक्ती जखमी झाल्या आहेत
मजुरांना त्यांच्या गावाला घेऊन जाणाऱ्या बसची यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी जवळील कोळवन गावाजवळ ट्रकला मागून धडक बसली. सोलापूर इथून मजूर बसने झारखंड राज्यात जात होते.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसमधील 3 प्रवासी जागीच ठार झाले तर 22 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.