Maharashtra News : दोन महिने पावसाने विश्रांती घेतल्याने नाशिक, नगर परिसरात पाणीबाणी सुरू झाली होती. शेतकरी हवालदिल झाले होते. जुन महिन्यात पाऊस काही प्रमाणात बरसला.
त्यावर खरीप पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली पण पिकाच्या वाढीसाठी पाऊसच न झाल्याने शेतकन्यांच्या हातून खरीप पिके गेले. त्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पिक विम्याची शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तरच बारमाही गोदावरी कालवे लाभधारक क्षेत्रात पीक चांगले येईल. जर पाऊस पडला नाही तर जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणी वाटपाचा कोलदांडा नाशिक भागातील धरण समूहावर पडणार आहे.
निळवंडे धरण अंतर्गत डाव्या कालव्याची चाचणी ३१ मे रोजी घेण्यात आली. या समूहात पाण्याचा साठा बऱ्यापैकी असल्याने त्याला पुन्हा पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे.
या पाण्याचा लाभ भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होईल. कारण कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावातील नागरिकांना पिण्याचे व जनावरांचे पाण्याचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. पूर्व भागातही पाण्याची परिस्थिती अवघड आहे. पाऊस नसल्याने जमिनीतील उष्णता प्रचंड वाढलेली आहे.
शेतकऱ्याकडे असलेल्या पशुधनासाठी हिरवा चारा अजूनही उपलब्ध झालेला नाही. शासन स्तरावर पालकमंत्री विखे पाटील व जिल्हाधिकारी यांनी चारा उपलब्ध करून देण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. पाऊस झालाच नाही तर शेतकन्यांपुढे पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न आहे.
कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून गणेशोत्सवात गुरुवारी व शुक्रवारी बऱ्यापैकी २ ते ३ इंच पाऊस झाला असून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत ४३८४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग संध्या सुरू आहे.