पारनेर :- उद्योजक व पंचायत समितीच्या सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते यांनी आपल्या गाडीतून तब्बल ५५ लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मात्र, मातब्बरांच्या मध्यस्थीनंतर कथित घटना घडल्यानंतर तब्बल १६ तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
याबाबत उद्योजक यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई येथून जामगावला आले.गाडीतून उतरल्यावर काही बॅगा त्यांच्या चालकाने घरात नेऊन ठेवल्या. एक बॅग गाडीत राहिली. नेमक्या त्याच बॅगेत तब्बल ५५ लाखांची रक्कम होती. एक बॅग गाडीत विसरल्याचे लक्षात आल्यावर धुरपते ती आणण्यासाठी गेले असता गाडीची एक काच फुटलेली दिसली.

गाडीतील बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जामगावमधील आपल्या मित्रांना, तसेच आमदार नीलेश लंके यांना बॅग चोरीला गेल्याची माहिती दिली. रात्री अडीच वाजता धुरपते यांनी सहकाऱ्यांसह पोलिस ठाणे गाठले. तक्रार ऐकून पोलिसही चक्रावले. तक्रार संशयास्पद असल्याचे पोलिसांचे मत झाले.
चोरीला गेलेल्या रकमेविषयी प्रश्न उपस्थित झाले. धुरपते यांनी प्रवासात एवढी मोठी रक्कम जवळ कशासाठी बाळगली? मोठी रक्कम असलेले बॅग गाडीत कशी विसरली? ही रक्कम कोणत्या व्यवहारातून आली? ती कोणाला द्यायची होती? अशा प्रश्नांचा भडीमार पोलिसांनी धुरपते यांच्यावर केला. एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
उद्योजक धुरपते यांची तक्रार ऐकून पोलिसही काही वेळ चक्रावले तालुक्यातील अनेक मातब्बरांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. मात्र, पोलिस बधले नाहीत. गुन्हा दाखल न करण्याच्या मुद्द्यावर पोलिस ठाम होते. मात्र, संध्याकाळी चक्रे फिरली व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.













