7th Pay Commission : वर्षातून दोनदा वाढणाऱ्या महागाई भत्त्यात सरकारने जानेवारीत किरकोळ वाढ केली. मात्र आता जुलैमध्ये सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून या काळात फक्त 2 टक्के महागाई भत्ता वाढवला होता. आता जुलै तो 3 ते 4 टक्क्यांनी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जानेवारीत 2 टक्के वाढ
सरकारने महागाई भत्त्यात पहिल्या सहामाहीत फक्त 2% वाढ केली. यामुळे सुमारे 1.2 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक नाराज झाले. आता जुलै-डिसेंबर 2025 साठी महागाई भत्ता (डीए) 3% ते 4% वाढवला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 55% महागाई भत्ता मिळतोय. जर जुलैमध्ये 3 ते 4 टक्के वाढ झाली, तर महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 ते 59 टक्क्यांपर्यंत जाईल.

कशी होते डीएची गणना?
सीपीआय-आयडब्ल्यूच्या वार्षीक सरासरी डेटाच्या आधारे डीए काढला जातो. त्यासाठी सातव्या वेतन आयोगात सूत्र तयार करण्यात आले होते.
डीए (%) = [(सीपीआय-आयडब्ल्यूची सरासरी – 261.42) ÷ 261.42] × 100 या सूत्राच्या आधारे सातव्या वेतन आयोगाचा महागाई भत्ता वाढतो. सीपीआय आयडब्लू निर्देशांक मार्चमध्ये 0.2 टक्क्यांनी वाढून तो 143.0 वर पोहोचला.
जुलैत 3 टक्क्यांची वाढ होईल?
मार्च 2025 पर्यंतच्या सरासरी CPI-IW नुसार, DA चा अंदाजे आकडा 57.06% पर्यंत पोहोचला आहे. एप्रिल, मे आणि जून 2025 मध्ये CPI-IW स्थिर राहिला किंवा थोडा वाढला तर ही सरासरी 57.86% पर्यंत जाऊ शकते. हा आकडा 57.50% पेक्षा जास्त असेल तर DA 58% पर्यंत वाढवता येतो. जर ते यापेक्षा कमी राहिले तर डीए 57% राहू शकतो.