पोलीस ठाण्याच्या आवारात 70 वर्षीय वृद्धाने स्वतःला पेटवून घेतले

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- न्यायालयीन प्रक्रियेत असलेला व्यवहाराचा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करुन सोडवावा यासाठी खांडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आज सकाळी पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी काही पोलीस कर्मचार्‍यांसह प्रसंगावधान राखून त्यांच्यावर वेळीच पाणी टाकले, मात्र त्यात तेे साठ टक्क्याहून अधिक भाजले असल्याचे माहिती मिळते आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खांडगाव येथील अनिल शिवाजी कदम वय 70 या नागरिकाने काही वर्षापूर्वी सादिक रज्जाक शेख याच्याशी घराच्या जागेचा व्यवहार केला होता. या जागेवरून दोघांमध्ये वाद होता. हा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ झालेला आहे.

तरीदेखील या वादात पोलिसांनी आपल्या घरातील शेख कुटुंबियांना बाहेर काढण्यात यावे अशी कदम यांची मागणी होती. हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ असल्याने पोलिसांना याबाबत कारवाई करणे अशक्य असल्याने कदम यांना पोलिसांनी समजावून सांगूनदेखील ते आपल्या मागणीवर ठाम होते.

कदम यांनी आपल्या घरातील वास्तव्य करणाऱ्या शेख कुटुंबियाला बाहेर न काढल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. पोलिसांना अर्ज मिळताच कदम यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र ते कोठेही आढळून आले नाही.

आज प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाच्या परिसरात अनिल कदम यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हा प्रकार पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजू गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत कदम यांच्यावर पाणी टाकत त्यांना विझाविले.

त्यांनतर कदम याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र 50 ते 60 टक्क्यापेक्षा अधिक भाजल्याने कदम याला नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.