Government scheme : सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न जरी असले तरी या समस्येचे मूळ हे पाणी हेच आहे. पाण्याचे योग्य नियोजन व साठवणूक व्हावी यासाठी पाठीमागे शासनाने मागेल त्याला शेततळे हा उपक्रम राबविला. याचा फायदा काहींनी घेतलाही असेल.
परंतु आता जिल्ह्यातील कुठल्याही १० गावांच्या एका क्लस्टरसाठी १०० शेततलाव खोदले जाणार आहेत. यामुळे सुमारे ५ कोटी लीटर पाणी साठवता येणार आहे. ग्रामीण भागात जलसंधारण व वनक्षेत्र वाढीसाठी कार्यरत असलेल्या
नवजीवन संस्थेमार्फत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे खास अभियान हाती घेतलं गेलं असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राजेंद्र पवार यांनी दिली. याबाबत आपण सविस्तर माहिती पाहुयात –
नवजीवन संस्था, कमिन्स इंडिया फौंडेशन व नाबार्ड बँकेच्या आर्थिक साह्याने लोकसहभागातून एकात्मिकपाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प’ राबवला जात आहे. याअंतर्गत २७ लाख ५० हजार लीटर क्षमतेचे शेततळे आजवर बांधले गेले आहेत. बीड, हिंगोली, पुणे, ठाणे जिल्ह्यात हे काम आजवर झाले आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे असेच काम सुरू आहे. आता नवजीवन नैसर्गिक शेततलाव उपक्रमांर्तत शंभर गावांमध्ये १०० तलाव बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गावांना आवाहन केले आहे.
१० गावांचे एक क्लस्टर, असे १० क्लस्टर निवडले जाणार आहेत. या गावांमध्ये प्रत्येकी ८-१० शेततलाव बांधले जातील.
* या शेत तळ्याचे नेमके कसे स्वरूप असणार? किती जागा गुंतणार ?
पावसाच्या पाण्याने नैसर्गिक शेततलाव भरावेत व आसपासच्या विहिरी, बोर यांना फायदा व्हावा असा उद्देश यामागील आहे. या तलावाचे माप ५० बाय ५० फुट रुंद व १२ फुट खोल असेल. काळ्या मातीत खोदले जातील. त्यात प्लॅस्टिक पेपर टाकला जाणार नाही.
एका तलावासाठी फक्त ६ ते ७ गुंठे जागा लागते. एका तलावात ८ लाख लिटर पाणी साठवता येते. त्यामुळे हे शेततळे त्या शेतकऱ्यासाठी फायदेशीर तर आहेच परंतु भूजल पातळी वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल.
* शेततळे बांधण्यासाठी किती खर्च येईल? हा खर्च कोण करेल?
शेततळे बांधण्यासाठी जो खर्च येईल त्याच्या ६० टक्के खर्च नवजीवन संस्थेकडून करण्यात येईल. उर्वरित ४० टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्यांना करावा लागेल. कनार्टकातील हुबळी येथील देशपांडे फौंडेशन तांत्रिक व आर्थिक सहकार्य करणार असल्याची माहिती नवजीवन फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र पवार यांनी दिली.
* उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर
शेतात शेततळे बांधण्यासाठी उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञान वापरले जाईल. याद्वारे जागा निश्चिती केली जाईल जेणे करून शेतात इतरत्र पाणी जमा न होता ते योग्य ठिकाणी साठवले जाते. त्याच्या बांधावर पिक घेऊन त्यातूनही उत्पन्न घेता येईल.