आर्थिकदृष्ट्या संकटात आलेल्या सहकारी बँकांवर प्रशासक मंडळ नेमून रिझर्व्ह बँकेने या बँका सुरक्षित केल्या असून, अभ्युदय बँकेवर नेमलेले प्रशासकदेखील त्याच प्रकारचे असल्याने ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये.
एकाही ठेवीदाराला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही ‘मुंबई को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन’चे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ठेवीदार व सर्वसामान्य खातेदारांनी प्रशासकीय मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहनही अडसूळ यांनी केले.
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अभाटय सहकारी बँकेचे संचालक मंडळ वर्षभरासाठी बरखास्त केले. ठेवीदारांमध्ये त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अडसूळ यांनी यावर पत्रकार परिषदेत खुलासा केला.
ते म्हणाले, रिझर्व्ह बँकने अभ्युदय सहकारी बँकेवर उच्च दर्जाच्या प्रशासकाप्रमाणेच त्याच दर्जाच्या सहाय्यकांची नेमणूकही केली आहे. या मंडळामुळे बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, अधिकारी यांचे भवितव्य उज्ज्वल होण्याची शक्यता आहे.
कोणतेही निर्बंध न लादता आर्थिक व्यवहार नियमित सुरू आहेत. या मंडळाच्या नेमणुकीमुळे बँकेच्या आर्थिक स्थैर्यास कोणतीही बाधा येणार नाही. त्यामुळे बँकेचे भागभांडवलदार, सभासद, सर्वसामान्य खातेदार, ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये.
अभ्युदय बँकेत गेल्या ४० वर्षांपासून आमची संघटना कार्यरत आहे. सध्या स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन आणि संघटना समन्वयाने काम करत आहेत. तरीही संपूर्ण सहकारी चळवळ आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांबरोबर कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भविष्याची काळजी घेतली जात आहे. एकाही बँक कर्मचारी, अधिकाऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.