अहमदनगर :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अहमदनगर मध्ये मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याचे समोर आले आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या वेग वेगळ्या गटांनी दोन स्वतंत्र जल्लोष साजरे केले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, संजय शेंडगे यांच्यासह काही नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला.

त्याचवेळी युवा नेते व माजी आ. अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड आणि त्यांच्या समर्थकांनी चितळे रस्त्यावर फटाके फोडून आणि घोषणा देत जल्लोष साजरा केला.राज्यात शिवसेनेची सत्ता येत असताना नगरमध्ये शिवसेनेतील ही दुफळी आज चर्चेचा विषय् ठरली होती.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरसेवक अनिल शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे व मंत्रीपदाची शपथ घेतलेले एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या जाहिराती दिल्या असून, त्यामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह माजी महापौर शिला शिंदे व सुरेखा कदम यांचे छायाचित्र आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे गेल्या काही दिवसांपासून राठोड यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा आरोप राठोड समर्थकांकडून खासगीत करण्यात येत आहे.













