अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावने येथील पती पत्नीसह सासूचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने ढोरजळगावने परीसरात शोककळा पसरली आहे.
ढोरजळगावने येथील पती बाळासाहेब निवृत्ती डाके (वय 45), पत्नी अंबिका बाळासाहेब डाके (40, रा.ढोरजळगावने, ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर, तसेच बाळासाहेब डाके यांची सासू सुमनबाई रघुनाथ नरवडे (65 रा. वरूर, ता. शेवगाव) हे पहाटेच्या सुमारास पैठणवरून औरंगाबाद येथील कांचनवाडी येथे जात होते.
पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास पैठण -औरंगाबाद रोडवरील ईसारवाडी फाट्याजवळ मारूती सुझुकी व्हॅन कार एमएच 12 सीके 3468 हिला समोरून भरधाव येणार्या अशोका लेलँड सीजे 06 ऐ झेड 6851 हिने जोराची धडक दिल्याने यामध्ये बाळासाहेब डाके, अंबिका डाके व बाळासाहेब यांच्या सासू सुमनबाई नरवडे हेे तिघेही जागीच ठार झाले.
अपघात इतका भिषण होता की कंटेनरने समोरील वाहनाला 50 फूट लांब फरफटत नेले. त्यांच्यावर पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बाळासाहेब व आंबिका डाके यांच्या पश्चात एक मुलगा एक अविवाहित मुलगी व विवाहीत मुलगी असा परिवार असून अत्यंत गरीब कुटुंबातील टायरपंक्चरचा व्यवसाय व मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणारे डाके कुटुंब होते.
ढोरजळगावने येथे शोकाकुल वातावरणात बाळासाहेब व आंबिका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर सुमनबाई नरवडे यांच्यावर वरूर येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातल्याने ढोरजळगांवने परिसरात शोककळा पसरली आहे.