अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी हॉटेल प्राईडच्या मागील दरवाजाच्या जाळीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत हॉटेलचालक आशिष चंद्रकांत कानडे याच्या डोक्यात धारदार शस्राने वार करून त्यांचा खून केला.
नंतर हॉटेलच्या गल्ल्यातील ४१ हजारांच्या रोकडेसह रमच्या बाटल्या चोरट्यांनी लांबवल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला, असे पोलिसांनी सांगितले. हॉटेल प्राईडच्या मागील जाळीच्या दरवाजाच्या साखळीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
हॉटेलचालक कानडे यांना कुलूप तोडल्याचा आवाज आल्याने ते दरवाजापाशी गेले. चोरट्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत डोक्यात धारदार शस्राने वार केला. जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. चोरट्यांनी नंतर गल्ल्याकडे मोर्चा वळवत त्यातील ४१ हजारांची रोकड लांबवली.
दोन हजार रुपये किमतीच्या रमच्या बाटल्याही बरोबर नेल्या. या घटनेची माहिती नागरिकांना कळताच त्यांनी हॉटेल प्राईडकडे धाव घेतली. श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली.
नगरच्या श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. तथापि, चोरट्यांचा माग श्वानपथक काढू शकले नाही. घारगावमध्ये इतर तीन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सुनील बळीराम पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.