अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेडमधील तिघा जणांना आज कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता आठ झाली असून त्यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतीमान केली आहे.
त्याचबरोबर, जिल्ह्यात २३ मार्च पर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन तपासणी करण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्ती ज्या व्यकींच्या संपर्कात आल्या त्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेने होती घेतले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. विनाकारण माहिती लपवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
जामखेड येथील एका धार्मिक स्थळात थांबलेल्या परदेशी नागरिकांपैकी दोघा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या सहकार्यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेड मधील व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्या सहकार्यांचे स्त्राव नमुने चाचणी अहवाल काल रात्री प्राप्त झाला. त्यात ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले. प्रशासनाने आता या तीन व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून या व्यक्ती इतर कोणाच्या संपर्कात होत्या, गेल्या काही दिवसात त्या कोणाकोणाला भेटल्या याची माहिती घेणे सुरु केले आहे. या व्यक्ती साधारणता ३० ते ४५ वर्षे वयोगटातील असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने ३७६ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २८५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत. आतापर्यंत ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल १४ दिवसानंतर निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. उर्वरित रुग्णांना आता बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आता बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे, त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवणे याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या अजून ५८ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल उद्या दुपारपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
सध्या आढळलेल्या बाधित रुग्णांची तब्बेत स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे. स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com