अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर – पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर प्रवासी एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
जामखेड-मुंबई अशीही बस होती. नगरच्या बसस्थानकावरून बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी समोरून येत असलेल्या ट्रकने बसला जोराची धडक दिली आणि बसमध्ये एकच मोठा आरडाओरडा झाला.
जोराच्या धडकेमुळे डोळ्यासमोर एकच अंधार होऊन माझ्यासह अनेक प्रवासी बेशुद्ध पडले अशी माहिती बस वाहक राजेंद्र पवार यांनी दिली.
जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून रुग्णालयाच्या प्रशासनाने अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी नियुक्त केले आहे.
अपघाताची माहिती जशी पसरत आहे, तसे प्रवाशांचे नातेवाईक नगरच्या रुग्णालयांमध्ये धाव घेत आहे. संपर्क करत आहेत.
त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा ही गोंधळ उडालेला आहे. जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी जखमी रुग्णांवर उपचार करत होते.
अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी मोठ्या रांगा लागल्या. दरम्यान, एसटी बस पुलाच्या बाजूला कलली असल्याचे दिसून येत आहे.
राजेंद्र मारुती पवार (वय ५२, रा.जामखेड), जॉर्ज मार्कस गायकवाड (वय २६, रा. बुरुडगाव, नगर), प्रसाद धनंजय चव्हाण ( वय २३, रा. चांदे कसारे, कोपरगाव), एकनाथ सुग्रीव रोडे ( वय २४, रा. वैजा, पाटोदा-आष्टी), शुभम किशोर दगडे (वय २३, रा. शिरूर कासार, जि. बीड), अकबर जैनुद्दीन शेख ( वय ७४, रा. शिरूर, जि. पुणे), शालन महादेव साठे (वय ४५, रा. औंध, पुणे), महादेव दादू साठे (वय ५८, रा. औंध , पुणे) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून, अन्य जखमींची ओळख पटलेली नाही.
(ही बातमी अपडेट होत आहे)