अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडी अखेर बिनविरोध झाल्या. समाजकल्याणच्या सभापतिपदी पुन्हा राष्ट्रवादीचे उमेश परहर यांची, तर महिला व बालकल्याणच्या सभापतिपदी काँग्रेसच्या मीरा शेटे यांची बिनविरोध निवड झाली.
मात्र, अर्थ व बांधकाम समिती आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद शिवसेनेचे काशीनाथ दाते किंवा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सुुनील गडाख यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अध्यक्ष राजश्री घुले विशेष सभा घेऊन या सभापतींची निवड करणार आहेत.
दरम्यान, अर्थ व बांधकाम समितीवरून शिवसेनेचे काशीनाथ दाते व क्रांशेपचे सुनील गडाख यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेने ऐनवेळी दाते यांचे नाव पुढे केल्याने शिवसेनेत दुफळी झाली. दातेंसाठी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय आैटी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली.
विषय समितीच्या सभापतिपदासाठी सर्वात पुढे नाव असलेले संदेश कार्ले यांचा अचानक पत्ता कट झाल्यानंतर काहीसे नाराज झालेल्या कार्ले यांनी सभागृहात दाते यांच्यासाठी शिवसेनेंच्या सदस्यांना व्हीप बजावला.
समाजकल्याण सभापतिपदासाठी उमेश परहर व सोमीनाथ पाचारणे यांनी अर्ज दाखल केले होते. पाचारणे यांनी माघार घेतल्याने परहर यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याणसाठी मीरा शेटे, दीपाली गिरमकर, सुषमा दराडे, राणी लंके यांनी अर्ज दाखल केले होते. गिरमकर, दराडे व लंके यांनी माघार घेतल्याने शेटे यांची बिनविरोध निवड झाली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com