अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहाता : छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; अन्यथा राहाता तालुका भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
राहाता तालुका भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार कुंदन हिरे यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेना खा. संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा अवमान केलेला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या घराण्याचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे.
प्रसारमाध्यमांसमोर बोलून बोलून खा. संजय राऊत यांच्याकडे काही मुद्दे नसल्याने ते अशाप्रकारे अभद्र बोलत असल्याचा आरोपही यात केला आहे. अशा प्रकारचे बेताल वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी थांबवावे आणि महाराष्ट्राची माफी मागावी; अन्यथा राहाता तालुका भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आलेला आहे.