अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत.
नगरच्या पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीबाबत चर्चेत असलेली दिलीप वळसे, बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख यांची नावे मागे पडून मुश्रीफ यांची नियुक्ती झाली आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा महाविकास आघाडीच्या नव्या सरकारद्वारे जिल्ह्यातील की बाहेरचा पालकमंत्री नेमला जातो, याची उत्सुकता होती.
या नव्या सरकारनेही कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करून बाहेरचा पालकमंत्री जिल्ह्याला दिला आहे.
कोण आहेत हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. सध्या ठाकरे सरकारमध्ये ते ग्रामविकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.
कागल विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाचव्यांदा बाजी मारत आपण जनतेच्या मनातील ‘हिंदकेसरी’ असल्याचे दाखवून दिलेले आहे. राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे.आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. त्यांनी कामगार मंत्रिपद सांभाळलं.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला. कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखान्यावर त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे.