अमरावती : महाविकास आघाडीचे सरकार हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची सहमती व पाठिंब्यामुळे आले आहे. यामुळे कुणी काहीही बोलले तरी राज्य शासनावर परिणाम होणार नाही.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काहीही वक्तव्य करताना तोलूनमापून बोलावे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी तिन्ही पक्षातील नेत्यांना तोलूनमापून बोलण्याचा सल्ला दिला.
अजित पवार म्हणाले, सीएए आणि एनआरसीबाबत सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. शेवटी हा नागरिकांचा अधिकार आहे. आंदोलन करीत असताना सुरक्षा व सुव्यवस्था राखावी तसेच कायदा कुणी हातात घेऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे.
सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. महाराष्ट्रात सीएए आणि एनआरसीमुळे कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची महाविकास आघाडीचे सरकार खबरदारी घेत आहे.