पिचड यांना जेलमध्ये जावेच लागेल. भाजपच काय, पण देव त्यांना वाचवू शकत नाही…

Ahmednagarlive24
Published:

अकोले :- शहापूर येथील ठाकर आदिवासी समाजातील १२ कुटुंबांच्या जमिनी खोटा दाखला घेऊन कवडीमोल भावात खरेदी करून १४.५ कोटी हडपण्याचा प्रयत्न केलेल्या माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांची पत्नी कमल यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी शहापूर तहसील कार्यालयावर भाजप नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला.

हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. बसस्थानक परिसरातून निघालेला मोर्चा पोलिसांनी मुख्य बाजारपेठेत रोखला. या वेळी आंदोलक व पोलिसांत बाचाबाची झाली. न्याय हक्कांसाठी निघालेला मोर्चा का अडवला, असा सवाल भांगरे यांनी पोलिस निरीक्षक आढाव यांना केला.

त्यावर मंत्रालयातून तसे आदेश आहेत, असे त्यांनी सांगितले. कोणी आदेश दिले, असे विचारले असता आढाव यांनी नाव सांगितले नाही. त्यामुळे तणाव वाढला. भांगरे यांनी तेथेच ठाण मांडून भाषण केले. भर पावसात आदिवासी रस्त्यावर बसून राहिले.

अटक केली तरी बेहत्तर, आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही, असे त्यांनी सुनावले. आदिवासींच्या फसवणूकप्रकरणी पिचड दाम्पत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा २२ ऑगस्टपासून शेकडो आदिवासींचे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा भांगरे यांनी दिला.

फौजदारी कारवाईसाठी ३० जुलैला अकोले तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनी सर्व संघटनांनी एकत्र येऊन क्रांतीची ज्योत पेटली. शासनाने सीबीआय चौकशी सुरू केली, पण ती धिम्या गतीने सुरू आहे.

चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी पिचड मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाला भाजपत गेले, पण आता त्यांना जेलमध्ये जावेच लागेल. भाजप सरकारच काय, पण देव त्यांना वाचवू शकत नाही.

आम्ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, वीरवीरसा मुंडा यांचे वंशज आहोत. आदिवासींच्या हितासाठी क्रांती करून अन्यायाच्या विरोधात बंड पुकारून परिवर्तन घडवून आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे भांगरे यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment