३ मार्च २०२५ मुंबई: सरकारचा पहिला अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने मांडून आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना चालू राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्य विधिमंडळाचे दुसरे तर पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार पासून सुरू होत आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अपेक्षे प्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी रविवारच्या चहापानाला यायला हवे होते. विरोधकांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले होते. पण त्यांनी ही संधी गमावली. त्यांनी ९ पानांचे पत्र दिले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले
विरोधकांमध्ये एकी दिसत नाही. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते नव्हते. सरकरने जे वेळोवेळी खुलासे केले आहेत ते योग्यरीत्या पाहिले असते तर विरोधकांना ९ पानांचे नव्हे तर अर्ध्या पानाचेच पत्र लिहावे लागले असते. विरोधकांनी पत्र दिले नसते आणि सभागृहात मुद्दे मांडले तरी आम्ही त्यांची उत्तरे देऊ.
हे सरकार या शिवरायांच्या विचारावरच चालेल. जर कोणी यासंदर्भात वक्तव्ये करत असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.या अधिवेशनात ५ विधेयके मांडली जातील.एक विधेयक संयुक्त समितीकडे प्रलंबित आहे.याशिवाय आणखी काही विधेयके आणली जातील. या सर्वांवर चर्चा करण्याची तयारी आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना आपले प्रश्न मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे.