बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास 15 लाखाची मदत जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यात बिबट्याने नागरी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या घटनेची राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ दखल घेतली आहे.

व बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास तात्काळ १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच बिबट्याला पकडण्याचे आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी यावल येथील पथक, जळगाव येथील पथक, नाशिक येथील पथक, नगर येथील पथक, ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्याचे जाहीर केले आहे.

पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याने मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या तीन घटना घडल्या. काल पाथर्डी तालुक्यातील शिरपूरगाव अंतर्गत पानतासवाडी शिवारात तारकनाथ वस्ती वरील सार्थक बुधवंत या तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेल्याची घटना घडली.

त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सर्थकचा शोध घेतला. पण नंतर त्याचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे नागरिकांकडून बिबट्याला पकडण्याची मागणी होत होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने या परिसरात शोध मोहीम राबवली.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांनीही वनमंत्री राठोड यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. त्यावर तात्काळ वनमंत्री राठोड यांनी दखल घेत बिबट्याला पकडण्याचे आदेश दिले. राठोड यांनी, स्थानिक नागरिकांनीही याकामी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

यापूर्वी या परिसरात बिबट्याने दोन हल्ले केले आहे. तिसगांव वनपरिक्षेत्रातील मौजे मढी कु.श्रेया सुरज साळवे ( वय – 03 वर्षे) आणि केळवंडी येथील चि. सक्षम गणेश आठरे ( वय – 08) याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. दुर्दैवाने हे दोघे जण या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. वन विभागाने त्यांच्या कुटुंबियांना यापूर्वीच मदत सुपूर्त केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment