अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील मोदी सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला आहे.
अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. यानिमित्त मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत निदर्शने केली. यावेळी डॉ.भामरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दिप चव्हाण, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष अज्जूभाई शेख,तालुका युवक काँग्रेसचे नेते अक्षयभाऊ कुलट,
क्रीडा विभागाचे प्रवीण गीते, शानुभाई शेख, कोकाटे सर, लांडे सर, जयंतराव वाघ, शिल्पाताई दुसुंगे, शरदभाऊ ठोंबरे, विद्यार्थी शहर अध्यक्ष दानिश शेख, मुबीन शेख, अन्वर सय्यद, दीपक घाडगे, योगेश काळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रताप पाटील शेळके म्हणाले की,
या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत नेणार आहोत आगामी काळामध्ये जिल्हा परिषद गट, त्याचबरोबर पंचायत समिती गण स्तरावरती शेतकरी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करतील. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की,कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संपवून टाकण्याचे षड्यंत्र केंद्र सरकारने चालवले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव या देशातील भांडवलदार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कवडीमोल किमतीने माल विकत घेवुन मजबूरी मध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे शोषण करतील.काळे पुढे म्हणाले की, कामगार विरोधी कायद्यामुळे भांडवलशाही राज्य या देशात येताना दिसते आहे.
ही हिटलरशाही आहे. याविरुद्ध काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे याला विरोध करत आहे.जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, शेतकरी वाचला तर देश वाचेल. शेती हा आपल्या देशाचा कणा आहे.
हा कणाच मोडून काढण्याचे काम मोदी सरकार करत आहे. काँग्रेस पक्ष हा या देशातल्या शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, महिला, गोरगरीब, सामान्य घटकांचा खरा आवाज आहे. या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून केंद्राला इशारा देत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved