अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा नागवडे यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश स्थगित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सीमेवरील सध्याच्या परिस्थितीमुळे प्रवेश सोहळा लांबणीवर टाकल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पडद्याआड झालेल्या जोरदार हालीचालींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
या घडामोडी प्रत्यक्षात उतरल्यास दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही मतदारसंघात आघाडी जुनी समिकरणे नव्या दमाने राबविताना दिसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या जिल्हा परिषद सभापती अनुराधा नागवडे यांना दक्षिण मतदारसंघात उमेदवारीचे संकेत देण्यात आले होते. त्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशाचीही तयारी सुरू होती.
मंगळवारी सायंकाळी त्यांच्या प्रवेशासाठी 28 फेब्रुवारी ही तारीखही ठरविण्यात आली. मुंबईतील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर हा छोटेखानी प्रवेश सोहळा होईल, हे देखिल निश्चित झाले होते.
मात्र आज अचानकपणे दुपारी 12 वाजेच्या सुमारास या नियोजनात बदल झाला. हा प्रवेश सोहळा स्थगित करण्यात आला. प्रवेश स्थगित केल्याच्या वृत्तास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दुजोरा दिला.
देशात अनेक ठिकाणी सध्या हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे हा प्रवेश सोहळा स्थगित करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, प्रवेशासाठी नवी तारीख किंवा पुढील वाटचालीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याची माहिती आहे. नगर दक्षिण मतदारसंघात राजकीय चक्रे नव्याने फिरण्याची चिन्हे आहेत.
दक्षिणेत डॉ.सुजय विखे कोणत्या पक्षाची उमेदवारी करणार? राष्ट्रवादी त्यांच्यासाठी जागा सोडणार का? की विखे राष्ट्रवादीचीच उमेदवारी करणार? हे प्रश्न पुन्हा जीवंत झाले आहेत.