शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराचे वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-सौर उर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले.

एकात्मिक उर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप,

आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहूरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, श्रीरामपूर च्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मागील काळात कोरोना प्रादुर्भावामुळे विकास कामे थांबली होती.

शासनाने कोरोना नियंत्रणासाठी मोठया प्रमाणावर उपाययोजना राबविल्या. गोरगरिबांना मोफत धान्य पुरवठा केला, आरोग्य सेवा दिली. जनतेच्या आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. लॉकडाऊनमुळे शासनाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. केंद्र शासनाकडून अद्यापही राज्याच्या वाटयाचे जीएसटीचे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये येणे बाकी आहे.

असे असले तरीही जिल्ह्याच्या विकास योजनेमधे कोणतीही कपात केली नाही. आमदारांना त्यांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. विकास कामांना सुरुवात झाली असून कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेले निर्बध कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींचे पालन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उर्जा राज्यमंत्री राहूरी परिसराचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येथील विकास कामांना निधी अपुरा पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकरी मोडला तर राज्य मोडते. शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याची काळजी महाविकास आघाडी शासन घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीच्या थकित वीज बीलासाठी सवलत योजना शासनाने जाहीर केली आहे. राज्यातील 44 लाख शेती पंप ग्राहकांची सुमार 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शासनाने शेती पंपाच्या बिलांवर सवलतीची योजना जाहिर केली आहे. शेतकऱ्यांनी शेती पंपाचे सवलतीच्या दरातील वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे व शासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सौर उर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या तीन एचपी क्षमतेच्या मोटारी चालणे शक्य होणार आहे.

मात्र सौर उर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची स्थानिकांनी काळजी घ्यावी. वांबोरी चारी प्रकल्प, ग्रामिण रुग्णालयासाठी इमारत बाधणे, राहूरी बसस्थानक नुतनीकरणाच्या बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या भाषणात राहूरी परिसरातील नियोजित उर्जा प्रकल्पांची माहिती दिली. यामुळे शेतीला वीजेचा तुटवडा भासणार नाही असे सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणारऱ्या शेतकऱ्यांना महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

शेती पंपाच्या थकित बिलावरील दंड माफ करुन व्याजात सवलत देण्यात आली असल्याने वीज देयक भरण्याचे त्यांनी आवाहन केले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राहूरी तालुक्यातील बाभूळगाव, वांबोरी, गणेगाव, आरडगांव, ताहाराबाद व शिरापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment