पारनेर :- पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी अवैध वाळूच्या वाहनाचा पाठलाग केल्याने वाळूतस्करांनी त्यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार- पारनेरच्या तहसीलदार ज्योती रामदास देवरे या दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ढवळपुरी शिवारात गस्तीसाठी गेल्या होत्या.

या वेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी वाळूच्या एका वाहनाचा पाठलाग केल्याने आरोपी अक्षय पाडळे आकाश रोहकले, बापू सोनवणे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर वाळूचा डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आरोपी अक्षय पाडळे ,आकाश रोहकले, बापू सोनवणे यांनी विनापरवाना व बेकायदा शासकीय वाळूची चोरी करून डंपरमध्ये भरून तिची वाहतूक करताना आढळला.
त्यावर शासकीय कार्यवाही करण्याकरिता तहसीलदार देवरे या वाळूच्या वाहनाचा पाठलाग करत असताना आरोपींनी वाळू रस्त्यावर सोडून दिली तसेच शासकीय कामात अडथळा आणून फिर्यादी व पथकातील धक्काबुक्की करून जीवितास धोका निर्माण केला. त्यानुसार पारनेर पालिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













