बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : बीडच्या अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. राष्ट्रीय विक्रमधारी २९ वर्षीय साबळेने ८:१९:५० सेकंद अशी सर्वोच्च वेळ घेत भारताला स्टिपलचेस या अॅथलेटिक्समधील मैदानी क्रीडा प्रकारात दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

साबळेने या बळावर इराणच्या हुसैन कहानीचा २०१८ मधील ८:२२:७९ सेकंदांचा विक्रम मागे टाकत नवा आशियाई विक्रमही आपल्या नावे केला. २०१० मध्ये महिला धावपटू सुधा सिंहने ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.

बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा साबळे रहिवाशी आहेत. शेतकरी कुटुंबात १३ सप्टेंबर १९९४ रोजी त्याचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत चालत किंवा पळत जात असे.

बारावीचं शिक्षण झाल्यावर त्याने लष्करात प्रवेश केला. अविनाश ५ महार रेजिमेंटचा जवान म्हणून २०१३-१४ साली सियाचेन या अतिथंड युद्धभूमीवर तैनात होता. त्यानंतर राजस्थान आणि सिक्कीममध्येही त्याने कर्तव्य बजावले.

२०१५ साली तो लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीत सहभागी झाला आणि त्याच्या अॅथलेटिक्समधल्या कारकीर्दीला सुरुवात झाली. अविनाशनं पुढे स्टीपलचेसची निवड केली आणि या स्पर्धेत वेगवेगळे राष्ट्रीय विक्रमही रचले. गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये त्याचे पदक अगदी थोडक्यात हुकले होते

माझ्या लेकाकडून कष्टाचे चीज

माझं लेकरू लहानपणापासूनच जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाने चालणार होते. त्याने अफाट कष्ट करून आजचे सुवर्णपदक मिळवले. लहानपणापासूनच त्याला धावण्याची आवड होती. शिक्षणासाठी आणि आपली खेळातील आवड टिकवण्यासाठी त्याने कुटुंबासोबत वीटभट्टीवरही काम केले. खूप हलाखीची परिस्थिती त्याने पाहिली आहे. तो लहानपणापासूनच हुशार आहे. देशासाठी यापुढेही तो धावत राहील आणि भारताला अनेक पदके मिळवून देईल. – वैशाली साबळे (आई)

अॅथलिटचा पदक धडाका

भारताच्या अॅथलिटनी हांगझूत रविवारचा दिवस गाजवला. तेजिंदरपाल सिंह तूरने गोळाफेकमध्ये प्रतिस्पर्धांना मागे सारत सुवर्णपदक गळ्यात घालण्याचा बहुमान मिळवला. तूरचा अंतिम आणि सहावा २०.३६ मीटरचा प्रयत्न सुवर्णपदक मिळवून देणारा ठरला. महिलांच्या १५०० मीटरमध्ये हरमीलन बैंसन रौप्यपदकापर्यंत धाव घेतली.

पुरुषांच्या १५०० मीटरमध्ये अजय कुमार सरोज आणि जिनसन जॉन्सनने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मुरली श्रीशंकरने रौप्यपदकाद्वारे भारताची शान आणखी उंचावली. नंदिनी अगासराने महिलांच्या हेप्टाथलॉन प्रकारात कांस्य आणि सीमा पुनियाने (५८.६२) थाळी फेकमध्ये कांस्यपदक मिळवले. महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत मात्र ज्योती याराजीला रौप्यपदकासाठी संघर्ष करावा लागला. अंतिम क्षणी चीनच्या धावपटूला अपात्र घोषित करण्यात आले आणि तिच्याकडून रौप्यपदक काढून घेण्यात आले.

गोल्फमध्ये एकमेव रौप्य

भारताची आघाडीची महिला गोल्फपटू अदिती अशोकने रौप्यपदक मिळवले. भारताच्या अन्य दोन महिला गोल्फपटू प्राणवी उर्स १३ व्या स्थानी, तर अवनी प्रशांत संयुक्तपणे १८ व्या स्थानावर राहिली. पुरुषांमध्ये अनिर्बान लाहिडी संयुक्तपणे १२ व्या, खलिन जोशी संयुक्तपणे २७ व्या एसएसएपी चौरसिया संयुक्तपणे २८ व्या आणि शुंभकर शर्मा संयुक्तपणे ३२ व्या स्थानावर राहिला.

बॅडमिंटनमध्ये सुवर्णची हुलकावणी

भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. अटीतटीच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला बलाढ्य चीनची भिंत भेदता आली नाही आणि त्यांना २-३ ने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जायबंदी एच. एस. प्रणयची भारताला उणीव जाणवली. तसेच २-० अशी आघाडी टिकवण्यात अपयश आल्यामुळे भारताने पहिला क्रमांक गमावला.

पदकांचे अर्धशतक पार

अॅथलिटच्या धडाक्यामुळे भारताने रविवारी पदकांचे अर्धशतक पार केले. १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि १९ कांस्यसहित भारताने दिवसअखेरीस आपली पदकतालिका ५३ पर्यंत पोहोचवली. चीन (सुवर्ण १३२) एकूण २४३ पदकांनी पहिल्या दिवसापासून आपले अग्रस्थान टिकवून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe