अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- नगर (राजेश सटाणकर यांचकडून) -जामखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर व्हावी, अशी मागणी अ.भा.वारकरी महामंडळाचे नाशिक-नगर विभाग प्रमुख हभप रवी सूर्यवंशी महाराज यांनी केली आहे.
याबाबत आ.रोहित पवार यांना निवेदन देऊन श्री.सूर्यवंशी यांनी त्यांना साकडे घातले आहे. खर्डा गावाकडे जाणारे रस्ते अत्यंत खराब असून, ते दुरुस्त करावे कारण जवळपासच्या 10-12 गावांचा बाजार हा खर्ड्याला होतो.
हे एक प्रमुख बाजार तळ आहे, म्हणून यासर्व गावांकडे जाणारे रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जामखेड तालुक्यातील मतेवाडी ते मधल्या मार्गे चौंडी (सोलापूर हायवे) पर्यंतचा रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत,
त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक झाला आहे. या खराब रस्त्यामुळे चौंडी-मतेवाडी वाहतूक करण्याचे लोक टाळत असल्याने संपर्क तुटला आहे. या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात यावे.
वाकी रोड खर्डा फाट्यापर्यंत हायवेला जोडणार्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खालचे गाव, वरचे गाव दोन्ही रस्ते खराब आहेत.
बाफना पेट्रोल पंप ते खर्डा फाटा हा 2 कि.मी. बायपास रस्ता केल्यास जामखेड शहरातील वाहतुकीची वर्दळ कमी होईल. जामखेड शहरातील मुख्य रस्ता प्रशस्त व दुपदरी करण्याची गरज आहे.
जामखेड – नगर या 73 कि.मी. रस्त्यावर दोन-अडीच फुटांचे खड्डे पडलेले आहेत. जामखेड – नगर महामार्गासहीत जामखेड – कर्जत, जामखेड – बीड, जामखेड – करमाळा आदि रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे या सर्व रस्त्यांकडे दुर्लक्ष आहे. आ.पवार यांचे सक्षम नेतृत्व आता जामखेड व कर्जत तालुक्याला लाभले असल्याने या प्रश्नी त्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि तो त्यांनी घ्यावा.
असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींचा जनसामान्यांशी संवाद कमी पडल्याने त्यांच्याकडे प्रश्न मांडण्याची वेळ कधी आली नाही,
पण जनसामान्यांशी संपर्क असल्याने आ.पवारांकडून या सर्व रस्त्यांची स्थिती बदलण्याची अपेक्षा आहे. तरी आ.पवार यांनी रस्त्यांचा प्रश्न सोडवावा, असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved