पत्रकार बाळ बोठेला अटक ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि सत्य …

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  मागील वर्षी 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र तेव्हापासून बोठे हा फरार आहे. गेल्या तीन महिन्यापासून बोठे याचा शोध लागला नाही. 

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. 

पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत :- रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.

हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट :-  बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देण्याचे कारण अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान, बोठे याने हनी ट्रॅप नावाने चालवलेल्या वृत्तमालिकेतून अनेक दिग्गजांची नावे समोर आली होती. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली :- रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केलंय. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बोठे हा पसार झालेला आहे.

आतापर्यंत दाखल झालेत इतके गुन्हे :- रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता त्याच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बोठेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष :- रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

अशी झाली होती हत्या :- रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली

जरेंच्या मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक :- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे हे अद्यापही फरार आहेत. रेखा जरे यांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरीही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. रुणाल जरे यांनी बाळ बोठे यांना राजकीय किंवा शासकीय यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप रुणाल जरे याने केला आहे.

राज्याच्या बाहेर अटक ?  बहुचर्चित रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर अटक करण्यात आली असल्याची चर्चा सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे. मात्र याबाबतची अद्याप तरी अहमदनगर पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

बाळ बोठेच्या अडचणीत वाढ :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झालीय. बोठेचा स्टॅंडिंग वॉरंट विरोधातील अर्ज पारनेरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय.

कायदेशीररित्या फरार घोषित :- जरे यांच्या खुनाला तीन महिने होऊन गेले. तरीही बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी गुरूवारी हा अर्ज मंजूर केला. त्यामुळे आता आरोपी बोठे याला कायदेशीररित्या फरार घोषित करण्यात आले आहे.

पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र :-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या प्रकरणात पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी १,५०० पानांचे आरोपपत्र (दोषारोपपत्र) पारनेर न्यायालयात सादर केले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात त्याला अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले.

यांच्याविरुद्ध आरोपपत्र :-  रेखा जरे हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ज्ञानेश्वर ऊर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रूक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

बोठेसमोर उरले दोनच पर्याय :- सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने बोठेचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करणे अथवा पोलिसांना शरण येणे एवढे दोन पर्याय बोठेसमोर आहेत. पारनेर न्यायालयाने यापूर्वीच बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केले आहे. या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देणारा बोठेने केलेला अर्ज फेटाळत पारनेर न्यायालयाने जारी केलेले स्टँडिंग वॉरंट जिल्हा सत्र न्यायालयाने कायम केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe