Big Breaking : अहमदनगरसह नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे पाणी सोडले !

Ahmednagarlive24
Updated:
Jayakwadi Dam

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे आता मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकच्या घरणांमधून पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदी काठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच वीजपुरवठा खंडित करणे, पोलीस बंदोबस्त देणे, याबाबतची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६०३ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला होता. तर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी पाणी मिळावे, यासाठी लढा देत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कारखानदारांकडून करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेतील ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला नकार दिला.

त्यानंतर महामंडळाने नाशिकच्या जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबतचे आदेश दिले. त्यावर जिल्हा प्रशासनाने महामंडळाला नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व पाणी सोडण्याबाबत लोकप्रतिनिधी व नाशिककरांचा असलेला विरोध तसेच पाणी सोडल्यास होणारा अपव्यय याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल महामंडळाला पाठवला. परंतु महामंडळाने पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे अखेर विसर्ग सुरू करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe