Ladki Bahin Yojana : महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांना आधीपासूनच पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी यासारख्या शासकीय योजनांमधून वार्षिक सहा ते बारा हजार रुपयांचा लाभ मिळतो, त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून फक्त ५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. तर, अशा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना पूर्ण १५०० रुपये मिळविण्याचा अधिकार राहणार आहे.
कधी मिळणार एप्रिल महिन्याचे पैसे?
महिलांना एप्रिल २०२५ महिन्याचा लाभ लवकरच मिळणार असून, अक्षय तृतीया या शुभ दिवशी राज्य सरकारने १५०० रुपये खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समजते. मात्र, अद्याप यासंबंधीचा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

१२ लाख महिल लाभार्थी
या योजनेत दिवसेंदिवस नियमांमध्ये बदल होत आहेत. निराधार योजना किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा स्वतंत्र लाभ मिळणार नाही. काही महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नको म्हणून अर्जही मागे घेतले आहेत. जिल्ह्यात जवळपास १२ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी असून, त्यांच्यासाठी दरमहा निधी वितरित केला जात आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.