Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्टफोन मिळणार आहे.
खरेतर, राज्यातील अंगणवाडी सेविकांनी नवीन स्मार्टफोन देणे, मानधन वाढ देणे इत्यादी मागणींसाठी गेल्या 53 दिवसांपासून संप केला जात होता. डिसेंबर 2023 पासून हा संप सुरू झाला होता.
आता मात्र या संपावर तोडगा निघाला आहे. राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्याची महत्त्वाची मागणी मान्य केली आहे.
यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 5,181 अंगणवाडी सेविकांना आता नवीन स्मार्टफोन मिळणार आहे. राज्यात मोठ्या अंगणवाडी असलेल्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी असलेल्या ठिकाणी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.
या अंगणवाड्यांचे काम एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत चालते. अंगणवाडीत सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते. याशिवाय त्यांना चांगला पोषण आहार देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आणि मदतनीस यांच्यावर असते.
एवढेच नाही तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस शासनाची वेगवेगळी कामे देखील करत असतात. दरम्यान, शासकीय कामांसाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना आधीच मोबाईल दिलेला आहे.
मात्र हा मोबाईल वर्षानुवर्षे वापरला गेला असून यावर आता योग्य पद्धतीने काम होणे अशक्य आहे. अंगणवाडी सेविकांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना मोबाईलवर बालकांची उंची, वजन, आहार, गृहभेटी, बालकांची उपस्थिती इत्यादी माहिती भरावी लागते.
मात्र जुन्या मोबाईलवर ही सारी कामे करणे अशक्य होत होते. यामुळे अंगणवाडी सेविकांनी नवीन मोबाईल तातडीने दिला गेला पाहिजे अशी मागणी केली होती. दरम्यान, ही मागणी शासनाने आता मान्य केली असून अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर नवीन स्मार्टफोन मिळणार आहे.
निश्चितच, राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांची कामे यामुळे सोपी होणार आहेत.
तथापि, अंगणवाडी युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर नवीन स्मार्ट मोबाइल अंगणवाडी सेविकांना मिळावा असे मत व्यक्त करण्यात आले आहे.