अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे: बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी शनिवार, दि. २१ डिसेंबरपासून बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, परीक्षेच्या दिवशीच सकाळपासून तो गायब झाल्याने परीक्षेच्या तणावाखाली कोठे तरी निघून गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सौरभ सज्जनकुमार बुधिया (२१, रा. बी.जे. मेडिकल हॉस्टेल, मूळ रा. सिलिगुडी, दार्जिलिंंग, पश्चिम बंगाल) असे बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत तो बेपत्ता असल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. सौरभची शनिवारी त्याची प्रात्यक्षिक परीक्षा होती. त्या दिवशी सकाळी तो हॉस्टेलमध्ये काही मित्रांना दिसला होता, मात्र त्यानंतर परीक्षा न देता गायब झाला.
त्यानंतर तो कोणालाही दिसला नाही. हॉस्टेलमधील रेक्टर तसेच मित्रांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद होता. मित्र, नातेवाइकांकडे दोन दिवस शोध घेऊनही तो सापडला नसल्याने रविवारी त्याचा मित्र रवी चव्हाण (२३) याने सौरभ बेपत्ता असल्याप्रकरणी तक्रार दिली.