१ सप्टेंबरला भाजपात मेगाभरती, काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा मोठा झटका, हे दिग्गज नेते मंडळी करणार भाजप प्रवेश !

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपा काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा मोठा झटका देण्यास सज्ज झाली आहे.

१ सप्टेंबरला भाजपात आता मेगाभरती होणार असून या वेळी नारायण राणे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे राणा जगजीतसिंह, जयकुमार गोरे ही दिग्गज नेते मंडळी भाजपात प्रवेश करणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही मेगाभरती सोलापूर येथे होणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या तेव्हापासूनच वाढत चालली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही भाजपात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा कायम होता.

काही दिवसांपूर्वीच मेगाभरती होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश करून राजकीय भूकंप घडवून आणला होता. 

आता या मेगाभरतीचा दुसरा टप्पा रविवार, १ सप्टेंबर रोजी होणार आहे. या वेळी पुन्हा दोन्ही पक्षांतील आणखी काही दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापूर येथे होत असून, त्या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत. याच वेळी हा मेगाभरतीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीपूर्वी पडलेले खिंडार सातत्याने मोठेच होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हे आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

गुरुवारी त्यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे अवधूत तटकरे यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment