अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पिस्तुलाचा धाक दाखवून भाजप कार्यकर्त्यास मारहाण व लुटमार करुनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुरेश धस व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शनिवारी तब्बल तीन तास पोलिस ठाण्यात धरणे धरले. त्यानंतर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा सहाजणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कृष्णा ज्ञानदेव बडे याला पोलिसांनी अटक केली. त्याला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
श्यामा अर्जुन हुले (ढाळवाडी, ता. पाटोदे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जामखेड येथे चित्रपट पहात असताना महादेव भिमराव खाडे (करंजवण, ता पाटोदे), ऋषिकेश गोवर्धन सानप, महेश गोवर्धन सानप, कृष्णा ज्ञानदेव बढे (सर्व सौताडा), स्वप्निल ऊर्फ राणा सदाफुले, सनी ऊर्फ प्रिन्स सदाफुले (जामखेड) व अनोळखी व्यक्तीने मला बाहेर येण्यास सांगितले. संशय आल्याने मी हातातील सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील सोन्याचे लॉकेट खिशात ठेवून बाहेर आलो. त्यांनी मला चित्रपटगृहाबाहेर बाथरूमकडे नेले व शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
नंतर बळजबरीने गाडीत बसवले. प्रतिकार केला असता महादेव खाडे याने पिस्तूल लावून बळजबरीने साकत रोडवरील दिलीप कांकरिया यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ नेले. तेथे हॉकीस्टीकने पायावर व कंबरेवर मारहाण केली. स्वप्निल सदाफुले याने मानेवर तलवारीने वार केला, मात्र तो मी हुकवला. ऋषिकेश सानप याने माझ्या खिशातील सोन्याचे ब्रेसलेट, लॉकेट, रोख रक्कम असा २ लाख ९३ हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. पोलिसांना सांगितले तर तुझ्या घरात घुसून जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. मला एकट्याला सोडून ते सगळे गाडीतून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी, २५ जानेवारीला हुले यांनी जामखेड पोलिसांकडे तक्रारअर्ज दिला. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही नंतर या, असे सांगितले. भाजप कार्यकर्त्यांनी बीडच्या खासदार मुंडे यांना फोन करून पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले. खासदार मुंडे, माजी मंत्री धस व माजी आमदार धोंडे हे जामखेडला आले व तब्बल तीन तास पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले.
भाजपचे खासदार व माजी आमदार पोलिस ठाण्यात आल्याचे कळताच शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव व निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अखेर आरोपींविरोधात अपहरण, मारहाण व आर्म अॅक्टसह गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कृष्णा ज्ञानदेव बडे या आरोपीस अटक केली.