Blog :अनिल राठोड – अहमदनगर शिवसेनेचा ढाण्या वाघ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली. नगर जिल्ह्यात शिवसेनेला हवा तसा आक्रमक आणि कट्टर हिंदुत्त्वाचा चेहरा अनिल राठोड यांच्या रुपानं मिळाला. नगर शहर १९८९ पूर्वी दंगलीमुळं राज्यातच नव्हे, तर देशात कुप्रसिद्ध होतं. या शहरातील धार्मिक आणि सामाजिक रचनाच अशी होती, की इथं कायम हिंसा, दंगली होतं.

अनिल राठोड यांनी दहशतवादमुक्त नगरचं स्वप्नं दाखविलं. दहशतवाद आणि भयमुक्त नगर अशा घोषणांवर त्यांनी सातत्यानं भर दिला. कुणावर अन्याय होत असेल, तर भैय्या धावून जायचे. पूर्वी कुणाच्याही मोटारसायकलवर मागं बसून भैय्या हजर. आमदार झाल्यानंतरही त्यांची हीच परिस्थिती. शहरातील कोणत्याही कार्यक्रमांना ते मोटारसायकलवरून जातं. त्यांच्या डोक्यात कधीच हवा गेली नाही.

सामान्यांतला आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. जिल्ह्यातील कथित नेत्यांच्या दडपशाहीविरुद्ध ते ठाम राहिले. एकदा एखाद्याला शब्द दिला, की त्याच्यासाठी काहीही करण्याची भैय्यांची तयारी. सत्तेचं वलय गेल्यानंतरही त्यांना त्याचं दुःख कधीच झालं नाही. स्कुटरवरून शहरात फिरताना त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही.

एकदा आमदार झाल्यानंतर नेत्याचं राहणीमान बदलतं. तसं भैय्याच्या बाबतीत कधीच झालं नाही. त्यांची आमदार निवासातील खोली सामान्यांना कायमच उपलब्ध असे. शिवसैनिकांवर कुठंही अन्याय झाला, तर भैय्या तातडीनं धावून जात. प्रसंगी स्वतःवर गुन्हे दाखल झाले, तरी त्यांनी कधीच पर्वा केली नाही.

अन्याय, अत्याचाराविरोधात उभं राहणारा आणि कुणाच्याही दावणीला कधीच न बांधला गेलेला नेता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार डाॅ.सुजय विखे यांची एकदा जबाबदारी घेतल्यांनतर त्यांनी ती निभावली. भैय्या यांचं स्थान इतकं महत्त्वाचं होतं, की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट वर्षावर बोलवून घेऊन त्यांच्याकडं विखे यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली.

त्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणा-या भाजपच्या श्रीपाद छिंदमच्या विरोधात याच भैय्यांनी किती मोठं आंदोलन उभारलं होतं, हे राज्यानं पाहिलं होतं; परंतु फडणवीस यांना हे ही माहीत होतं, की भैय्या हा शब्दाला जागणारा नेता आहे. त्यामुळं तर त्यांनी राठोड यांच्यावर विखे यांच्या विजयाची जबाबदारी सोपविली. शहरातला भाजपचा एक गट विरोधात असतानाही राठोड यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात आणून दाखविला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment