नगर जिल्ह्यावर राधाकृष्ण विखेंचे गारुड !

Ahmednagarlive24
Published:

नगर जिल्ह्यात पूर्वीपासून विखे यांची यंत्रणा गावोगाव होती; परंतु ती स्वतःच्या गटापुरतं पाहत होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील नेते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अडकले आहेत.

स्वतःचा मतदारसंघ सोडून कुणालाही कुठं जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे; परंतु राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे मात्र शिर्डीत अडकून पडलेले नाहीत. त्यांना त्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री असल्यानं त्यांनी त्यांची ताकद इतर मतदारसंघात लावली आहे. 

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यापुढं या वेळी रोहित पवार यांचं मोठं आव्हान आहे. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडं एकही नेता नाही, की ज्याच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे.

शिवसेनेचे उमेदवार ही त्यांच्या मतदारसंघातून बाहेर पडत नाहीत. भारतीय जनता पक्षातील अन्य उमेदवारही त्यांच्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत एकट्या विखे यांनी मात्र संपूर्ण जिल्ह्यात लक्ष घातलं आहे. 

खासदार डाॅ. सुजय विखे व त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून युतीच्या उमेदवारांच्या मागं आपली ताकद उभी केली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाऊसाहेब कांबळे यांना अवघड आहे, असं जेव्हा वाटलं, तेव्हा राधाकृष्ण यांनी स्वतःच सर्व सूत्रं हाती घेतली.

त्यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यांशी संपर्क साधला. ज्या मुरकुटे यांनी बाळासाहेब विखे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती, त्या मुरकुटे यांच्याविरोधात मनात कुठलीही कटुता न ठेवता पक्षहितासाठी त्यांना बरोबर घेतलं. 

श्रीरामपूरच्या निवडणुकीतील वा-याची दिशाच त्यामुळं बदलली. लोकसभेच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात बारापैकी अकरा मतदारसंघात युतीला मताधिक्य होतं.

अकोले मतदारसंघातच फक्त काँग्रेस आघाडीला मताधिक्य होतं. पिचड हे शरद पवार यांच्या अतिशय जवळचे होते. त्यामुळं विखे-पिचड यांच्यातही दुरावा होता; परंतु विखे यांनी जुनं वैर विसरून स्वकीयांना नाराज करून भारतीय जनता पक्षाची एक जागा वाढावी, म्हणून मधुकर आणि वैभव या दोन्ही पिता-पुत्रांना भाजपत आणलं.

राधाकृष्ण विखे यांचे एकीकडं पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांशी चांगले संबंध आणि दुसरीकडं स्थानिक नेत्यांशीही जवळीक आहे. यामुळं मुख्यमंत्रीही त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदा-या सोपवायला लागले आहेत.

यापूर्वी विखे ज्या पक्षात, त्या पक्षाच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या अशी टीका व्हायची. आता ती टीकाच कृतीतून खोडून काढण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. 

आपल्या जवळचे नाराज झाले, तरी चालतील; परंतु पक्षहित सर्वांत महत्त्वाचं हे आता त्यांनी मनावर घेतलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशोक भांगरे आणि राजेश परजणे. अकोल्यात पिचड यांना बरोबर घेतल्यामुळं भांगरे राष्ट्रवादीत गेले. 

कोपरगावच्या आ. स्नेहलता कोल्हे या विखे यांच्या भाची लागतात. त्यांच्याविरोधात राधाकृष्ण यांचे मेहुणे राजेश यांनी बंडखोरी केली. खरंतर अशा वेळी नेत्यांची मोठी गोची होते. कोणाचीही एकाची बाजू घेतली, की दुसरा नाराज होतो.

अशा वेळी संबंधित मतदारसंघात न फिरकणंच श्रेयस्कर असतं. भाचीपेक्षा मेहुणा जवळचा असताना राधाकृष्ण विखे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर भाची भाजपची उमेदवार असल्यानं तिच्या मागं आपली ताकद उभी करण्याचा शब्द दिला. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं असो, की आताच्या प्रचाराच्या निमित्तानं विखे त्यांच्याबरोबर सावलीसारखे होते. 

जामखेड तालुक्यात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यापुढं रोहित पवार यांनी आव्हान उभं केलं आहे. तिथं प्रा. शिंदे यांच्यामागं विखे यांनी आपली ताकद उभी केली आहे. ज्यांनी विखे कुटुंबीयांच्या राजकारणाला विरोध केला, त्यांनाही भाजपत आणून बेरजेचं राजकारण करण्यावर राधाकृष्ण यांचा यांचा भर आहे. 

वसंतराव झावरे आणि सुजीत झावरे यांच्या पराभवाला विखे कारणीभूत होते. त्या वेळची त्यांची भूमिका नंदकुमार झावरे यांना पाठबळ देण्याची होती. नंदकुमार आणि वसंतराव यांचं कधीच जमलं नाही. पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे हे विखे यांचेच आहेत; परंतु त्यांच्या जोडीला आता सुजीत यांना भाजपत आणलं आहे.

राजकीय तडजोडी पदांच्या आश्वासनांशिवाय होत नाही. सुजीत यांना जिल्हा परिषदेत स्थान देण्याता तोडगा राधाकृष्ण यांनी काढला. पारनेरमधील भाजप आ. विजय आैटी यांच्यावर नाराज होता. नेत्यांच्या नाराजीची किंमत विधानसभेसाठी मोजावी लागू नये, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यावर विखे यांनी भर दिला.

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार होता. मागच्या वेळी पाचपुते पराभूत झाले होते. राष्ट्रवादीचा आमदार पुन्हा निवडून यायचा नसेल, तर पाचपुते विरोधकांत फूट पाडली पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं.

शिवाजीराव नागवडे यांचा काँग्रेसमधील गट कधीही विखे यांच्याबरोबर नव्हता. राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. त्यांना तिथं जाऊ न देता भारतीय जनता पक्षात आणण्याचं काम विखे यांनी केलं. त्यामुळं पाचपुते यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. 

राहुरी तालुक्यातील आपली सारी यंत्रणा त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या बाजूनं उभी केली आहे. नगरमध्ये अनिल राठोड यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. 

नगरमधील मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी ते व्यूहरचना आखीत आहेत. दुसरीकडं संगमनेरमध्येही साहेबराव नवले यांच्या मागं आपली यंत्रणा विखे यांनी उभी केली आहे. जिल्ह्याचं एकमुखी नेतृत्त्व यापूर्वी कधीही विखे यांच्याकडं नव्हतं; परंतु आता राधाकृष्ण यांच्या बेरजेच्या राजकारणामुळं ते आता नक्कीच त्यांच्याकडं यायला लागलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment