मुंबई :- भाजप सरकारला पाठिंबा देणार्या अजित पवार यांना दिलासा मिळालाय, सिंचन घोटाळ्याच्या 72 हजार कोटींच्या आरोपातून अजित पवार यांची सुटका झाली आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत अजित पवार यांना 72 हजार कोटींच्या या घोटाळ्यातील आरोपांमध्ये क्लीन चिट दिली गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यावरून ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या कामातील अनियमितता, निकृष्ट बांधकाम, वाढलेली सिंचन क्षमता आणि प्रकल्पांच्या सुधारित किंमतींवरून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांनी बैलगाडी मध्ये भरून तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या काळात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जलसंपदा विभागामध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचाराची कागदपत्रे जलतज्ज्ञ माधव चितळे यांना सादर केली होती.













