ब्रेकिंग न्यूज : कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या विष्णू भागवतला अखेर अटक !

Ahmednagarlive24
Published:

नाशिक / अहमदनगर :- कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि.च्या मुख्य संचालक तथा सूत्रधार विष्णू भागवत यास नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे.  न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमीष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रूपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माऊली, उज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिध्दी प्रॉडक्ट इंडियाचा संचालक संशयित आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

विष्णू भागवत व त्यांच्या साथीदारांवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुंतवणूकदाराने फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रसिसाद देत दुसर्‍या गुंतवणूकदाराने अंबड पोलीस ठाण्यात २ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली.

या आर्थिक गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या पथकामार्फत सुरु आहे. विष्णू भागवत याने संकल्पसिद्धी स्किम ऑक्टोबर २०१८ मध्ये चालू करुन जानेवारी २०१९ पर्यंत हजारो सभासदांकडून करोडो रुपये गोळा केले. गुंतवणूकदारांना प्रॉडक्ट व परतावा न देता नमुद स्किमचे कामकाज बंद करुन गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे.

भागवतविरूध्द हिमाचलप्रदेशच्या चंबा पोलीस ठाण्यासह पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील आळेफाटा, नाशिकच्या जायखेडा, भांडुप, जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्येही गुन्हे दाखल आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना भागवत फसवणूकीच्या गुन्ह्यांत हवा होता. 

ऑक्टोबर 2015 ते जानेवारी 2019 याकाळात श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि व संकल्पसिद्धी प्रोडक्ट प्रा. लि. मध्ये गुंतवणूक म्हणून ठेवलेल्या रकमेच्या बदल्यात जादा परताव्याचे आमिष दाखवत होता.

जानेवारी 2019 मध्ये परतावा परत न करता कंपनीचे संचालक विष्णू भागवत यांनी फिर्यादी संंदीप भीमराव पाटील यांची एकूण 53 लाख 43 हजार 120 रुपयांची फसवणूक भागवत यांनी केल्याची तक्रार मागील वर्षी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपासाअंती पुढे आलेल्या तक्रारदारांनुसार आतापर्यंत एकूण 3 कोटी 83 लाख 68 हजार 308 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.तर इतर तक्रारदार पुढे आल्यास हा आकडा 20 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भागवत याने संचालक असलेल्या उज्वलम अ‍ॅग्रो मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीमधील ठेवीदारांनी सोसायटीत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेचा परतावा न करता ठेवीदारांना कोणत्याही प्रकारे माहिती न देता तसेच कृषी मंत्रालायाची परवानगी न घेता उज्वलमच्या ठेवी परस्पर श्री. माऊली मल्टीस्टेटमध्ये वर्ग करून त्यांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

या एजंटना झाली अटक ..
कृष्णा भुजंग वारे (३९, रा.पाथर्डी, जि. अहमदनगर), मयूर सुनील पवार (२७, रा. पवार वस्ती, बाजीरावनगर, ता. येवला), प्रकाश आप्पासाहेब ननावरे (३७, रा. नातेपुते, माळशिरस,सोलापूर), धनंजय भीमराव सावंत (४०, रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सिलापूर), दादा महादेव माने (२६, रा. बारामती), नानासाहेब अशोक पायघन (३५, रा. तळवाडे, ता. हवेली, जि. पुणे), रोहिदास शांताराम हजारे (४८, रा. भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment