कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांना मिळाले हे मंत्रीपद !

संगमनेर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या अशा महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने गुरुवारी (दि.१२) सायंकाळी संगमनेरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.
ना. थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते. महसूल विभाग हायटेक बनविताना ऑनलाईन सातबारासह पारदर्शी व चांगल्या कामातून या विभागाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ना. थोरात यांच्याकडे महत्त्वाच्या अशा महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर ऊर्जा व शालेय शिक्षण, पशुवैद्यकीय या खात्यांचा भार ना. थोरात यांच्याकडे असणार आहेत.
काँग्रेसच्या अडचणीच्या काळात पक्षाला उर्जितावस्था देणाऱ्या ना. थोरात यांनी कायम महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या विकासाचा विचार केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे सर्वजण मोठ्या आशेने पाहतात.
ना. थोरात यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते राहील, असा अहमदनगर जिल्ह्यासह सर्वांना मोठा विश्­वास होता. अनेक दिवस लांबलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर आज शिक्कामोर्तब होताच संगमनेरात सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला.
अमृतनगर, यशोधन कार्यालय, नामदारांचे निवासस्थान, नवीन नगर रोड, सय्यदबाबा चौक अशा विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. गावोगावीही गुलालाची उधळण झाली.