Maharashtra News : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतकरी शेताची नांगरणी बैलजोडीने न करता ट्रॅक्टरने करून घेत आहेत. परंतु इंधन दर वाढीचा सर्वाधिक मोठा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
भाडेतत्वावर शेतीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी मशागतीच्या दरात वाढ केल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शेती करताना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. पूर्वी मोठ्या शेतकऱ्या कडे दोन ते चार बैलजोड्या तर लहान अल्पभूधारक शेतकऱ्याकडेसुद्धा किमान एक बैलजोडी तरी असायची.
त्यामुळे प्रत्येकाकडे बैलजोडी असल्याने शेतीची सर्व कामे बैलांच्या सहाय्याने केली जात होती. परंतु सध्या शेतर्क यांकडे बैलजोडी नसल्याने व डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली असल्याने शेत मशागत करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.
कारण शेतकऱ्याने शेत मशागतीसाठी केलेल्या खर्चाइतकेदेखील उत्पन्न मिळेल, याची शाश्वती नसल्याने तो चिंतेत आहे. आजच्या यांत्रिक व स्पर्धेच्या युगात ट्रॅक्टर उधारीवर किंवा लोनद्वारे उपलब्ध होत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरीसुद्धा ट्रॅक्टर आला आहे.
यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळेची व परिश्रमाची बचत होत असली तरी इंधन दरवाढीने शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. दरम्यान, सुपा परिसरात मजुरीचे दरही वाढले आहेत. वाढीव दर देऊनही वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत.
गत सहा ते सात वर्षांपासून शेतकरी नापिकीने बेजार असून, यावर्षी शेतमालाचे भाव पडलेले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा न होता त्याची झोळी रिकामीच आहे. त्यातच मशागतीचे दर वाढल्याने शेती व्यवसाय तोट्यात आला आहे.
बाजारात शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत असून, तो रखरखत्या उन्हामध्येही सध्या शेतातील अंतर्गत मशागतीच्या कामात गुंतला असल्याचे चित्र दिसत आहे.