केंद्र सरकारने दिली महाराष्ट्राला मोठी भेट! महाराष्ट्रातील ‘या’ दोन रेल्वे मार्गांना मिळाली मंजुरी; मिळेल कृषी,पर्यटन उद्योगाला मोठी चालना

New Railway Route In Maharashtra:- कुठल्याही राज्याचा किंवा देशाचा विकास होण्याकरिता दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे असते. जितकी देशातील महत्त्वाचे शहरे एकमेकांशी जोडली जातील तितक्या प्रमाणावर मालाचे किंवा प्रवाशांची वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून अशा दळणवळणाच्या सुविधांचा खूप मोठा हातभार लागतो.

यामध्ये रस्ते प्रकल्प, रेल्वे प्रकल्प खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या जर आपण भारतामध्ये बघितले तर अनेक मोठमोठे एक्सप्रेसवे म्हणजे रस्ते प्रकल्पांची कामे सुरू असून काही नवीन रेल्वे मार्गांची देखील उभारणी करण्यात येत आहे व यामध्ये काही मार्ग प्रस्तावित आहेत.

या दृष्टिकोनातून जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली आहे असे म्हणावे लागेल. कारण केंद्र सरकारने रेल्वे विभागाच्या माध्यमातून राज्यातील दोन महत्त्वाच्या अशा रेल्वे मार्गांना मंजुरी दिली असून त्याचा थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांपासून तर पर्यटन उद्योगापर्यंत मोठ्या प्रमाणावर होणार आहे

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रेल्वे प्रकल्पामध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग हा 160 किलोमीटरचा असणार असून यामध्ये भुसावळ ते खंडवा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे जो 131 किलोमीटर अंतराचा आहे. तसेच हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 7927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.

कृषी, पर्यटन व रोजगार निर्मितीला मिळेल चालना
हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 7927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली असून हे रेल्वेमार्ग आता मंजूर झाल्यामुळे या मार्गावरून जी काही मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक केली जाईल तिला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळेल.तसेच पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे. या प्रकल्पामध्ये मनमाड ते जळगाव दरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे व त्यावर साधारणपणे 2773 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तसेच दुसरा मार्ग जर बघितला तर तो भुसावळ ते खंडवा असा असणार असून त्यामध्ये 131 किलोमीटर लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे व याकरिता साधारणपणे तीन हजार पाचशे चौदा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय होईल फायदा?
रेल्वे प्रकल्पांचा जर आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे असलेले अजिंठा आणि वेरूळ लेण्या तसेच देवगिरी किल्ला, रेवा किल्ला, यावल अभयारण्य असिरगड किल्ला इत्यादी अनेक पर्यटन स्थळांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

इतकेच नाही तर या प्रस्तावित प्रकल्पामुळे मुंबई- प्रयागराज- वाराणसी मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्याकरिता देखील कनेक्टिव्हिटी यामुळे वाढण्यास मदत होणार आहे.

धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील ओंकारेश्वर आणि वाराणसी येथील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाना जाणाऱ्या भाविकांना देखील याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

इतकेच नाही तर चित्रकूट, गया, प्रयागराज आणि शिर्डी सारख्या धार्मिक स्थळांना भेट देणे सोपे होणार असल्याने साहजिकच या ठिकाणाच्या पर्यटन उद्योगाला देखील चालना मिळणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.