अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क,
अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.
दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत सहभागी झाले.
तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.
कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे.
कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved