नवी दिल्ली :- संसदेत नागरिकत्व घटनादुरुस्ती विधेयकावर तिखट चर्चा सुरू असताना देशातील तमाम विरोधक पाकिस्तानचे हितचिंतक बनले असून, ते पाकची भाषा बोलत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला आहे.
नागरिकत्व विधेयकाचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विरोधक समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत; परंतु भाजपच्या नेत्यांनी व खासदारांनी सत्यस्थिती समाजापुढे मांडावी, असे आवाहन मोदींनी केले आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
ते म्हणाले की, मागील सहा महिन्यांत कलम ३७० रद्द करणे, अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक कार्य सरकारने केले आहे. आता भाजपच्या खासदारांनी जनतेपर्यंत हे काम पोहोचविण्याची नितांत गरज आहे.
परंतु नागरिकत्व विधेयकाच्या मुद्यावरून काही विरोधी पक्ष पाकिस्तानसारखी भाषा बोलत आहेत. याचा भंडाफोड जनतेमध्ये करा, असा सल्ला मोदींनी दिला आहे. धार्मिक शोषणामुळे देश सोडून पलायन करणाऱ्या भारतीयांना सध्या अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत.
ते अनिश्चिततेच्या वातावरणात वास्तव्य करीत आहेत; परंतु नागरिकत्व कायदा बनल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.