कॉंग्रेसला मोठा धक्का,विखे पाटील कॉंग्रेस सोडणार ?

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : राज्याचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या पक्षावर जाहीर टीका करताना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय असे वक्तव्य केले.

दरम्यान स्वताच्याच पक्षावर टीका करताना उद्या सकाळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय. 

सुजय विखे पाटील भाजपात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पक्षावर जाहीरपणे टीका केली. त्याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखेंनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. 

File Photo

त्यानंतर सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखेंनी जाहीरपणे सुजय विखेंचा प्रचार करत असल्याचंही दिसून आलं होतं. मुलाने भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेही प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी ‘मी भाजपचा उघड प्रचार केला, मला कोणाची भीती आहे’ असा सवालही राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसला केला. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेकांना कधी विखेंना बाहेर काढतो आणि मी नेता होतो, अशी घाई झाली आहे, अशी खोचक टीका त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. 

‘मी पक्षात असताना माझ्यावर टीका केली, बॅनरवरून माझे फोटो काढले’ असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय.

आज यांना विखेंचं महत्त्व कळलंय म्हणून यांनी माझे फोटो पोस्टर लावले. पण तुम्ही माझे कितीही फोटो वापरुन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला तरी लोक तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असे राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसविरोधात बोलताना सांगितले.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिर्डी मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पण त्यापूर्वीच काँग्रेसला या मतदारसंघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment