अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनच्या आदेशामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे भाजीपाल्यासह फळविक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. भाजीसह फळांचे दरही कोलमडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने तो हवालदिल झाला आहे.
शेतात काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला, फळे तसेच इतर सर्वच शेतमाल कवडीमोल किंमतीला विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये भाजीपाला व फळांची लागवड केली आहे.
त्यामुळे सध्या बाजारात मोठया प्रमाणात भाजीपाला व फळे विक्रीसाठी येत आहेत. परंतू लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्यांना गावभर फिरुन भाजीपाला विकावा लागत आहे.
अतिशय कमी दरात माल विकला जात असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लॉकडाऊनने विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने यावर प्रभावी उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
कारण अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला तोडणी व विक्रीअभावी शेतातच पडून आहे. एकीकडे बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी माल खरेदी करत नाहीत. तर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत.
बाजारपेठ उघडेना, मजुर मिळेना व व्यापारी माल घेईना, अशा तिहेरी संकटात बळीराजा अडकला आहे. तोडणी अभावी फळे झाडावरच सडून जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
मोठया बाजारपेठेत जाणारा भाजीपाला वाहतूक बंद असल्याने माल उत्पादनासाठी झालेला खर्चही निघणे मुश्कील होऊन बसले आहे. कोरोनाच्या अकाली संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे निर्यातीत अडचण निर्माण होत असल्याने त्याचा फटका किती दिवस सहन करावा लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®