कोरोना व्हायरस : अहमदनगरसह राज्यात 5 जण निरीक्षणाखाली

Published on -

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आज ५ जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले आहे. पुणे येथे तीन जणांना, तर अहमदनगर व जळगाव येथे प्रत्येकी एक जण भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये २५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनासंबंधी सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नये, चीन व कोरोना बाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केले.

कोरोनाबाधित भागातून येणाऱ्या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते. हे चुकीचे आहे. अशा व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांपर्यंत दैनंदिन सर्वेक्षण केले जाते. या काळात कोणतीही लक्षणे न आढळलेल्या व्यक्तींना तपासणीची गरज नाही. त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मागू नये असे आवाहनदेखील आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत 30 जणांना भरती करण्यात आले आहे. यातील 5 प्रवासी काल भरती झाले आहेत.  यातील 3 जण नायडू रुग्णालयात  तर प्रत्येकी  1 जण जिल्हा रुग्णालय  अहमदनगर आणि जळगाव येथे भरती करण्यात आला आहे.

आतापर्यंत 25 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही पुणे यांनी कळविले आहे. आज भरती झालेल्या पाचहीजणांचे नमुने आज प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. आज नायडू रुग्णालयात भरती झालेल्या 3 रुग्णांपैकी एक चिनी नागरिक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe