अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.
तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक मारण्यात आली. सदर मागण्यांची दखल न घेतल्यास आरपीआयच्या वतीने रस्त्यावर खाजगी दवाखान्यांचा बाजार मांडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव शहरासह जिल्ह्यात वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये अनागोंदी माजली आहे. कोरोना सोडून इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. एखाद्या रुग्णाची तब्यत खालवल्यास सर्व खाजगी रुग्णालय कोरोना चाचणी केल्याशिवात त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश देखील देत नाही.
रुग्णाला ह्रद्य, मधूमेह, रक्तदाब असल्यास त्याची तब्यत लवकर खालवते. कोरोना चाचणी करुन त्याचा रिपोर्ट येऊ पर्यंत रुग्ण दगावले जात आहे. सर्वच्या सर्व रुग्णांना दवाखान्यात कोरोना संशयीत म्हणून पाहिले जात असून, यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने शहरासह जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
तर शहरातील लहान मोठे क्लिनिक व हॉस्पिटल बंद असून, येथील डॉक्टर ऑनलाईन तपासणी करुन मोबाईलवर औषधांची चिठ्ठी देत आहे. तर त्याची फी गुगल पे च्या माध्यमातून जमा करायला सांगत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
परिस्थिती खालवलेल्या रुग्णांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळे पर्यंत न थांबता तातडीने त्यांना उपचार द्यावे, उपचार न करता रुग्णांना घरी पाठवणार्या हॉस्पिटलवर कारवाई करावी, रुग्णांना उपचार मिळण्यासाठी व तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक हेल्पलाईन नंबर जाहीर करावा,
ज्यांनी क्लिनिक व हॉस्पिटल बंद ठेवले आहेत त्यांचे दवाखान्याचे परवाने रद्द करावे, कॅशलेस पॉलिसी असणार्या रुग्णांकडून आगाऊ रक्कम भरुन न घेता त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करुन घ्यावे. सदर मागण्यांचा या संकटकाळात दखल घेऊन सर्वसामान्य रुग्णांना उपचार कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved