दोन दिवस दर्शन बंद : वारकरी दर्शनाला मुकणार!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-सध्या करोनाची लस जरी बाजारात आलेली असली, तरी या महामारीचा फटका पंढरीच्या वारीला देखील बसला आहे. कारण, माघी यात्रेच्या काळात दोन दिवस श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

माघ दशमी आणि एकादशी म्हणजेच २२ व २३ फेब्रुवारी रोजी दर्शन बंद ठेवण्याचा निणर्य मंदिर समितीच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. या अगदोर करोनामुळे चैत्री, आषाढी आणि कार्तिकी यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. या चार यात्रेला भाविक न चुकता विठुरायाच्या दर्शनाला आवर्जून पंढरीत येतात. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तसेच, माघी आणि चैत्री यात्रेला देखील जवळपास ४ ते ५ लाख भाविक पंढरपुरमध्ये दाखल होत असतात.

मात्र यंदा करोना महामारीमुळे सुरवातीला चैत्री नंतर आषाढी, कार्तिकी यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते. करोनाच्या काळात १७ मार्च २०२० रोजी श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीच्या पाडव्याला भाविकांसाठी दर्शन खुले झाले.

मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणीचे केवळ मुख दर्शन आणि इतर नियमांचे पालन करण्याची अट सरकारने घातलेली आहे. या पार्शवभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची माघी यात्रेबाबत मंगळवारी बैठक झाली. माघी यात्रेला कोकण, मराठवाडा आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येतात.

या बैठकीत सरकारने करोनाबाबत इतर नियम शिथिल केले असले, तरी अजूनही काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. गर्दी होऊ नये आणि इतर सरकारी नियमाच्या आधीन राहून, माघी यात्रेतील दशमी आणि एकादशी असे दोन दिवस भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती, औसेकर महाराज यांनी दिली.

मात्र असे जरी असले तरी हे दोन दिवस देवाचे सर्व नित्योपचार सुरु राहणार असल्याचेही समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. एकूणच करोनाची लस जरी आली असली, तरी वारकरी संप्रयदायाला मात्र वर्षातील प्रमुख तीन यात्रांच्या वेळी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेता आलेले नाही आणि आता माघी यात्रेत देखील दर्शन घेता येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!