किरकोळ महागाईच्या दरात घट, सामान्यांना दिलासा

Published on -

Maharashtra News : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. मार्चमध्ये ४.८५ टक्क्यांच्या पातळीवर असलेली किरकोळ महागाई एप्रिलमध्ये घसरून ४.८३ टक्क्यांवर आली असल्याचे

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये किरकोळ वाढून ८.७० टक्क्यांवर पोहोचली, मार्चमधील ८.५२ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त वाढ झाली आहे.

सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला किरकोळ महागाई दर दोन टक्क्यांच्या फरकासह चार टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मध्यवर्ती बँक आपल्या द्विमासिक आर्थिक आढाव्यात व्याजदर ठरवताना किरकोळ महागाईचे प्रमाण लक्षात घेते. खाद्यान्न महागाईची अनिश्चितता राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेसह सर्व पतमानांकन संस्थांनी किरकोळ महागाई ५ टक्क्यांच्या खाली राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तथापि, तो अजूनही रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या ४ टक्के मर्यादेपेक्षा जास्त आहे.

परिणामी रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता तो आहे त्याच पातळीवर ठेवला होता. रिझर्व्ह बँकेला अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येत असताना, खाद्यपदार्थांच्या किमती देशाच्या महागाईसंदर्भात अतिरिक्त जोखीम निर्माण करत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.

मार्चमध्ये किरकोळ महागाईचा आकडा ४.८५ टक्क्यांवर आला होता, तर एप्रिलमध्ये तो पुन्हा ४.८३ टक्क्यांवर आला आहे. या काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम दिसून आला. एप्रिलमधील ४.८३ टक्क्यांचा किरकोळ महागाई दराचा हा ११ महिन्यांतील नीचांकी स्तर आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये ही महागाई ४.८१ टक्के होती. एप्रिल महिन्यात मात्र खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण महागाईचा दर ५.४५ टक्क्यांवरून ५.४३ टक्क्यांवर आणि शहरी महागाईचा दर ४.१४ टक्क्यांवरून ४.११ टक्क्यांवर आला आहे.

किरकोळ महागाईत सातत्याने घट झाल्याचा फायदा व्याजदर कपातीच्या रूपाने मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँक जूनमध्ये नाणेनिधी धोरण आढावा बैठकीत रेपो दरावर निर्णय घेईल. किरकोळ महागाई कमी झाल्यामुळे व्याजदरदेखील कमी करू शकते. मात्र महागाई ४ टक्क्यांच्या खाली जाण्यास वेळ लागेल, असे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe