वीजबिल वसुलीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महावितरण कंपनीने थकबाकीदारांना वीज कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण पुढे करीत राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत.

दरम्यान निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास वीजप्रवाह खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या मुद्याला राजकीय रंग देखील येऊ लागला आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान वीजबिलाच्या मुद्यावरून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं वक्तव्य करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नगर दौऱ्यावर आले होते.

यावेळी त्यांनी यामुद्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वीजबिल वसुलीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

ते आज श्रींगोदा येथे आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना वीजबिल वसुलीबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज पंपासाठी सवलत सरकार देत असल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवार नेमकं काय म्हणाले? “जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही.

मात्र आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांना वीज पंपांकरता सवलत दिली आहे. त्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे. शेवटी हे चालवण्याकरता निधी लागतो.

तरी देखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता माफ केले आहेत”, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंदा येथे पत्रकारांसोबत बोलताना केलं