अहमदनगर लाईव्ह 24 टीम/मुंबई : केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतरित केल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. शिवसेनेने केंद्र सरकारला “काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा”, असा टोला ‘सामना’ मुखपत्रातून लगावला आहे.
हिंदुस्थान हा संघराज्यांचा देश आहे. प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार व स्वाभिमान आहे. केंद्राची मनमानी त्यामुळे अस्थिरतेस आमंत्रण देते. ‘एनआयए’ने महाराष्ट्रात झडप घातली. अशी अनेक प्रकरणे भाजपशासित राज्यांत घडत आहेत. तेथे केंद्राचा हस्तक्षेप का नाही? महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘रात्रीची’ सेवा बजावली. राजभवनाचा वापर केला, पण तेथेही काही झाले नाही.
आता एल्गारप्रकरणी रात्रीच गृहमंत्रालयाने ‘एनआयए’ला महाराष्ट्रात पाठवले. हे लक्षण बरे नाही. रात्रीच्या अंधारात पाय ठेचाळू नयेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने मुंबई रात्री उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळोखात पाप करू नका. काय असेल ते उजेडात करा. समझनेवालों को इशारा काफी है!
या सर्व गोष्टींची ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का? शनिवारवाडय़ासमोरच्या एल्गार परिषदेत काही बाहेरच्या लोकांनी भडकावू भाषणे केली. ही भाषणे करणारे लोक भाजपच्या भाषेत ‘तुकडे तुकडे गँग’चे सदस्य होते हे मान्य केले तरी या तुकडे तुकडे गँगपेक्षा भयंकर विखारी भाषणे सध्या भाजपचे नेते, मंत्री करू लागले आहेत.
आंदोलन करणाऱयांना, सत्य बोलणाऱयांना गोळय़ा घाला, देशाबाहेर फेकून द्या, अशी उन्मत्त भाषा मंत्रीपदावरील व्यक्ती करीत आहेत. अर्थात हा त्यांचा राष्ट्रभक्तीचा ‘एल्गार’ ठरतो व त्यामागे एखादे षड्यंत्र आहे का याचा तपास व्हावा असे कुणास वाटत नाही.